असे मिळवा निवडणूक ओळखपत्र

असे मिळवा निवडणूक ओळखपत्र भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार बजाविण्यासाठी प्रत्येक नागरिकाला भारतीय निवडणूक आयोगातर्फे निवडणूक ओळखपत्र दिले जाते. निवडणुकीबरोबरच नित्यनेमाच्या अनेक कामांसाठी हे ओळखपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. असे हे महत्त्वपूर्ण निवडणूक ओळखपत्र काढण्याची नेमकी प्रक्रियाSpotLight Marathi ( स्पॉटलाइट मराठी)‘च्या माध्यमातून.

कोणत्याही व्यक्तीला अर्ज करताना किंवा इतर कागदपत्रासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रश्न उद्भवल्यास १९५० या हेल्पलाइन क्रमांकाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अर्जदार dydeomsd@gmail.com या ईमेल आयडीवरही अधिक संपर्क करू शकतात.कोणता अर्ज घ्याल?

नवीन मतदार नोंदणीसाठी – नमूना ६

अनिवासी भारतीय मतदार नोंदणीसाठी – नमुना ६ अ

मृत / स्थंलातरीत मतदारांची नावे वगळण्यासाठी किंवा आक्षेप घेण्यासाठी – नमुना ७

ओळखपत्र प्राप्त करणे किंवा यादीतील नाव/ लिंग /पत्ता दुरुस्तीसाठी – नमुना ८

विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत पत्ता बदलण्यासाठी – नमुना ८ अ

ऑनलाइन प्रक्रिया

राज्य निवडणूक आयोगाने इच्छिकांनी ऑनलाइन अर्ज करता यावा, यासाठी वेबसाइटही सुरू केली आहे. त्यानुसार इच्छिकांनी ceo.maharashtra.gov.in या वेबसाइटवर भेट दिल्यास संपूर्ण प्रक्रिया समजू शकते. दिलेल्या वेबसाइटवरील विहित नमुने अर्ज सादर केले गेले असून, त्या-त्या अर्जाबरोबर आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यानुसार अर्जदार अर्ज करू शकतात.
नवीन मतदार नोंदणीसाठी

निवडणूक आयोगातर्फे दिल्या जाणाऱ्या मतदार ओळखपत्रासाठी अर्जदारांना सर्वप्रथम नमुना अर्ज भरणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने मतदारसंघात त्याचे नाव आधीच नोंदविलेले आहे, त्या मतदारसंघातील निवासस्थान सोडून अन्य ठिकाणी स्थंलातरीत झाल्यावरही आयोगाकडून वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात किंवा प्रत्येक विधानसभा निवडणूक कार्यालयात अर्ज भरता येऊ शकतो. यासाठी प्रत्येक विशेष कार्यक्रमही जाहीर करण्यात येतो. अथवा इतर कालावधीमध्ये केवळ मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करता येतो. त्यानुसार विविध अर्ज निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. त्यानुसार अर्ज करता येऊ शकतो. ते पुढील प्रमाणे आहेत. या अर्जामध्ये अर्जदाराचे नाव, पत्ता, त्याचे वय आणि त्याचे छायाचित्र असणे आवश्यक असते. त्यानुसारची कागदपत्रे अर्ज भरताना सादर करावी लागतात.

वयासाठी आवश्यक कागदपत्रे

मतदार ओळखपत्रासाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्रे म्हणून १८ वर्षे पूर्ण केलेल्या वयाचा पुरावा असणे गरजेचे आहे. यासाठी पालिकेतर्फे देण्यात येणारे जन्म प्रमाणपत्र किंवा शैक्षणिक संस्थेने दिलेले जन्मदिनांक प्रमाणपत्र या अर्जाबरोबर जन्माचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो किंवा जर अर्जदार इयत्ता दहावी उत्तीर्ण असेल तर ती जन्मतारीख नमूद केलेली दहावीची गुणपत्रिका असणे गरजेचे आहे. किंवा जन्मतारिख नमूद केलेली आठवीची गुणपत्रिका आवश्यक कागदपत्रासाठी गरजेचे ठरते. जर अर्जदार शिक्षित नसेल तर त्याच्या पालकांच्या परिशिष्ट १मध्ये विहीत नमुन्यात घोषणपत्र देणे गरजेचे आहे किंवा संबंधित ग्रामपंचायत सरपंचाने किंवा संबंधित महानगरपालिका/ नगर परिषद यांच्या सदस्याने दिलेले वयाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पासपोर्ट, पॅनकार्ड, वाहन परवाना, यूआयडीएचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
राहत्या ठिकाणाच्या पुराव्यासाठीची कागदपत्रे

जन्माच्या पुराव्यासाठी अर्जदार ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणाचा पुरावा असणेही गरजेचे आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने विविध कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार यासाठी​ बँक, किसान, डाक कार्यालयाचे पासबुक हे पुराव म्हणून ग्राह्य धरता येते. तर इन्कम टॅक्स विभागाचे आदेश, पासपोर्ट, वाहन परवाना, किंवा रेशन कार्ड हेही वापरता येऊ शकते. याशिवाय अर्जदाराच्या नावावर किंवा त्याच्या पालकांच्या नावावर फोन, पाणी, वीज, गॅस जोडणीचे बिलही राहत्या पुराव्यासाठी ग्राह्य धरली जातात. मुख्य म्हणजे, जे व्यक्ती बेघर असतात, त्यांनी नमूद केलेल्या पत्त्यावर मतदान केंद्रीय कार्यालयातील रात्री भेटी देऊन ते व्यक्ती त्याठिकाणी राहतात की नाही, याची नोंद केली जाते.

कशी होते प्रक्रिया

विहित अर्जानुसार संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा अर्ज जवळच्या विधानसभा निवडणूक कार्यालय किंवा आयोजित विशेष मोहिमेतील अधिकाऱ्याकडे सादर करणे गरजेचे असते. हा अर्ज सादर केल्यानंतर निवडणूक अधिकारी दिलेल्या अर्जातील पत्त्यावर भेट देऊन खातरजमा करत असतात. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर हा अर्ज भरला जाऊन एक क्रमांक दिला जातो. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित अर्जदाराचा अहवाल निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठविण्यात येतो. त्यानंतर त्याचे ओळखपत्र तयार केले जाते. त्यानंतर या ओळखपत्रावर होलोग्राम स्टिकर लावण्यात येतो. त्यानंतर ओळखपत्राची संपूर्ण तयारी पूर्ण करून संबंधित ओळखपत्र बुथ लेव्हल ऑफिसरकडे पाठविण्यात येते. ते हे ओळखपत्र संबंधित अर्जदारांना प्रदान करतात. जर ही संपूर्ण प्रक्रिया विशेष मोहिमेच्या माध्यमातून राबविण्यात आली, तर यास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. इतर वेळेस साधारण सहा ते सात महिन्यांचा कालावधीत ही संपूर्ण प्रक्रिया राबविली जाते.
कशी कराल जोडणी…

http://ceo.maharashtra.gov.in/AadharSeed/ या लिंकवर गेल्यानंतर आपले मतदारयादीतील नाव शोधण्याचा पर्याय येतो. त्यात आवश्यक ती माहिती भरत गेल्यानंतर आपले नाव, मतदार ओळखपत्र क्रमांक, मतदारयादी भाग क्रमांक, वय, लिंग आदी माहिती दाखवली जाते. त्याच्या समोरच ‘फीड युवर आधार नंबर’ असा पर्याय असतो. त्यावर क्लिक केल्यानंतर नवी विंडो ओपन होते. त्यात आधार कार्डवर असलेले आपले नाव, मतदार ओळखपत्र क्रमांक, आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी ही माहिती भरावी लागते. ई-मेल आयडी वगळता बाकी सगळी माहिती भरणे बंधनकारक आहे; तसेच शक्य असल्यास आधार कार्डाचा जेपीईजी स्वरूपातील (८०० केबी आकारापर्यंतचा) फोटोही अपलोड करावा. त्यानंतर खाली असलेल्या ‘सबमिट’ बटणावर क्लिक केल्यावर आपली माहिती आयोगाकडे सादर होते. एकदा ‘सबमिट’ केल्यानंतर माहितीत कोणतेही बदल करण्याचा पर्याय उपलब्ध नाही. ‘ईआरओ’कडून माहितीची पडताळणी झाल्यानंतर समजा काही कारणाने ती माहिती फेटाळली गेली, तरच माहिती पुन्हा भरता येते. पहिल्याप्रमाणेच आपले नाव शोधून पाहिल्यानंतर आपल्या माहितीचे ‘ईआरओ स्टेटस’ कळते. तसेच सर्वांत पहिल्या विंडोमध्ये आपली मतदार ओळखपत्रविषयक माहिती जिथे दिलेली असते, तिथे पुढेच ‘फॅमिली’ असाही एक पर्याय असतो. त्यावर क्लिक केल्यास आपल्या कुटुंबातील सर्वांची मतदार ओळखपत्रविषयक माहिती एकत्रितपणे समोर येते.

Akshay Sakrate is a Marathi You Tuber, Website Developer, and Owner/founder of SpotlLight Marathi (स्पॉटलाइट मराठी) He is from Pune, Maharashtra. He is known for his Marathi Videos on various online topics on his 1st youtube channel SpotLight Marathi( स्पॉटलाइट मराठी).

Leave a Comment